'ट्रेन' मधला एक वेगळाच 'काव्य' अनुभव - ओंकार करंदीकर
१० एप्रिल २०२५ या दिवशी ठाणे च्या 'डॉ. काशिनाथ घाणेकर' लघु नाट्यगृहात एक कवितांचा ओपन माईक कार्यक्रम होता. त्यात मीही माझ्या ४ कविता सादर केल्या होत्या. पहिल्यांदाच अश्या मोठया स्टेज वर आणि श्रोत्यांसमोर मी माझ्या कविता सादर करत होतो. खरंतर शाळेनंतर पहिल्यांदाच स्टेजवर जाऊन काहीही परफॉर्म करत होतो. १९-२० कवी/कवयित्री आलेले होते, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ऐकता आल्या. छान झाला कार्यक्रम.
खरा 'वेगळा' अनुभव मात्र त्या नंतर आहे. कार्यक्रमानंतर मी ठाणे स्टेशनला आलो. तिकडून डोंबिवलीला यायला ट्रेन पकडली. ती कसारा ट्रेन होती. दुपारची वेळ असल्याने फार काही गर्दी नव्हती, बसायलाही मिळालं. तर माझ्या समोर एक मुलगा बसला होता, साधारण माझ्या च वयाचा असेल, बहुतेक त्याच्या पत्नी सोबत आला होता. खरंतर मी ट्रेन मध्ये उगाचच अनोळखी लोकांशी बोलायला जात नाही, पण का कुणास ठाऊक मला असं वाटलं ह्याला बहुतेक आपण नाट्यगृहात पाहिलं आहे म्हणून त्या दिवशी मी बोललो. मी त्या मुलाला विचारलं,"तुम्ही आला होतात का मगाशी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात?.. तुम्हाला पाहिल्या सारखं वाटतंय", तर तो म्हणाला," नाही".
मध्ये थोडा वेळ गेला. मग त्या मुलानेच मला विचारलं,"नाट्यगृहात काही कार्यक्रम होता का?, तुम्ही बघायला गेला होता का?". आता नेहमी मी कुठल्याही सभागृहात कार्यक्रम बघायलाच जात असतो, त्यामुळे 'हो' असंच उत्तर असतं, पण यावेळी मी जरा खुश होऊन सांगितलं की, "हो...कार्यक्रम होता, पण बघायला फक्त नाही, मीही त्या कार्यक्रमात सदारकर्ता म्हणून सहभागी होतो", मग त्याने विचारलं, "कसला कार्यक्रम? ".. मी म्हंटलं "कवितांचा...", तो म्हणला,"अरे वाह!! .. तुम्ही कविता करता .. कसा झाला कार्यक्रम?.." वगैरे...मग मी त्या कार्यक्रमाविषयी विषयी थोडं बोललो.. त्याने सहज विचारलं, " मानधन मिळालं का ? " मी म्हंटलं, " नाही हो.. मी कुठे फेमस आहे ..मानधन वगैरे नाही .. आपणच पैसे भरून रजिस्टर करायचं कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी .." (आणि ह्यात मला काही चुकीचं वाटत नाही .. असा कार्यक्रम आयोजित करायचा आणि स्टेज उपलब्ध करून द्यायचं .. तर आयोजकांना थोडे पैसे तर मिळायला हवेतच ना.. especially असा महत्वाचा कार्यक्रम असेल ... कवितांना वाहिलेला तर ).
मध्ये परत थोडा वेळ गेला .. मग त्याने मला विचारलं, "तुम्ही कोणत्या प्रकारच्या कविता करता? .. म्हणजे प्रेम/दुःखी वगैरे वगैरे ..", मी म्हंटलं, " असा माझा काही ठरलेला विषय किंवा प्रकार नाही .. वेगवेगळ्या विषयांवर सुचेल तसं लिहितो म्हंटलं .. कधी थोडं आजूबाजूच्या परिस्थितीवर किंवा मानसिक स्थिती वर भाष्य करणारं .. कधी दुःखी , कधी थोडं रोमँटिक .. कधी तरी मुक्तछंदात.. कधी अभंग,गझल.. वगैरे.. त्या त्या वेळी जे सुचेल ते... ". मग त्याने विचारलं," तुमचे आवडते कवी कोण मराठी मधले?".. मी म्हंटलं," बरेच आहेत.. आत्ताचे संदीप खरे, वैभव जोशी.. पूर्वीचे कुसुमाग्रज.. बा. भ. बोरकर .. विंदा करंदीकर .. मंगेश पाडगांवकर .. आरती प्रभू.. वगैरे .. अजून ही आहेत .. ग.दि.माडगूळकर .. शांता शेळके .. ". मग तो म्हणाला, " तुम्हाला बहिणाबाई चौधरी माहीत आहेत का? .. मी म्हंटलं, " हो अर्थात", मग तो म्हणाला," तुम्हाला अहिरणी येतं का ?".. मी म्हंटलं, "नाही हो .. येत असं नाही, पण 'मन वढाय वढाय' ' ही बहिणाबाईंची कविता मला खूप आवडते..". यावर तो खुश झाला .. आणि म्हणाला," मी खानदेशचा आहे .." . मग थोडा वेळ कसं बहिणाबाई नी मनाविषयी इतकं सुंदर लिहिलंय .. त्यातली २-३ कडवी मला आठवली .. काही त्याला आठवली.. आणि खरंतर लिहिता वाचता येत नसताना सुद्धा इतकं सुंदर काव्य त्यांना सुचलं आहे या विषयी बोललो .. मग मी म्हंटलं की, "कसं त्यांच्या सोबतच्या कोणीतरी हे लिहून ठेवलं असणार .. म्हणून आता आपल्याला वाचता आलं ..".(जसं सावरकरांची 'ने मजसी ने' कविता.. त्यांना स्फुरली आणि त्यांच्या कोणा मित्राने ते सुंदर महान काव्य नोंदवून ठेवलं). अशी च कविता वगैरे बद्दल चर्चा सुरु होती, मग तो म्हणाला, "तुम्ही रवींद्रनाथ टागोर यांचे 'गीतांजली' वाचलंय का ?.. मी एक सेकंद उडालोच .. म्हंटलं, " नाही हो .. बंगाली काहीच वाचलं नाहीये ..पण याचा कुठे अनुवाद मिळाला ..मराठी/इंग्रजी तर बघतो मी .. ". आणि हे म्हणताना परत एकदा मला जाणीव झाली की आपल्याला किती कमी माहित आहे .. खरंतर किती आणि काय काय माहितच नाहीये.
तो मुलगाही इंजिनिअर च होता माझ्यासारखा( शिक्षणाने अर्थात.. ) .. तो ठाणेचाच होता आणि नाशिक ला निघाला होता .. मग थोडं नाशिक.. त्र्यंबकेश्वर .. इगतपुरी.. वगैरे बोलणं झालं . तो मध्येच म्हणाला," तुम्ही कधी पासून लिहिता कविता?". मी म्हंटलं," तसं तर शाळेत असल्या पासूनच .. पण नंतर जरा खंड पडला .. परत इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या चौथ्या वर्षाला असताना लिहू लागलो .. नंतर परत थोडा खंड पडला.. असं बंद पूर्ण नव्हते झालं .. पण पुढे MBA , जॉब वगैरे मुळे कमी झालं लेखन .. कोव्हिड- १९ लॉक डाऊन मध्ये परत सुरु झालं .. बरंच सुचलं .. परत नंतर दुसऱ्या जॉब मुळे थोडा खंड पडला .. नंतर परत लिहू लागलो ..". (आणि मी क्षणभर स्वतःशीच विचार केला की कवितेचं खरंतर असं आहे की कधी सुचेल सांगता येत नाही .. अनेक महिने काही सुचणार ही नाही .. आणि मी शक्यतो मुद्दाम ओढून ताणून लिहीत नाही .. एखादा विषय डोक्यात घोळत असतो .. आणि एखाद्या दिवशी अचानक फटाफट शब्द बाहेर येतात..) ,तर असो.. तो मुलगा म्हणाला," मी पण लिहायचो शाळेत असताना.. पण नंतर बंद झालं .. ", मी म्हंटलं," मग आता लिही ..आता सुरु कर.. ". मी म्हंटलं, "आता आपण दोघं ही दर्दी आहोत म्हणून ही कवितांची चर्चा होऊ शकली.. नाही तर लोकं कंटाळतात मी असं काही बोलू लागलो की .. ".
इतक्यात मला माझं डोंबिवली स्टेशन येतंय असं दिसलं. मी म्हंटलं," माझं स्टेशन आलं ..मला उतरावं लागेल .. नाही तर अजून बराच वेळ ही चर्चा झाली असती .. ठाणे ते डोंबिवली अर्धा तास कसा गेला कळलंच नाही .." तो ही हसला ( कदाचित त्या मुलाची बायको वैतागली असेल!! .. किंवा नसेल ही .. तिच्या चेहऱ्यावरून तरी तसं वाटलं नाही .. ), आणि मी डोंबिवलीला उतरलो .. त्या मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेण्याचं डोक्यातही नाही आलं त्या गडबडतीत .. असो पण एक छान वेगळाच अनुभव होता. गम्मत म्हणजे .. ट्रेन मध्ये नंतर जेव्हा मी उतरण्यासाठी दाराकडे चाललो होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं आजूबाजूचे वयाने मोठे किंवा थोडे वयस्कर लोकं माझ्या कडे आणि आम्ही दोघे काय बोलत होतो याकडे थोडं आश्चर्याने बघत होते .. (किंवा कौतुकाने ? .. निदान मी तरी असा अर्थ घेतला.. ), २ तरुण मुलांकडून.. ते ही आत्ताच्या .. त्यांना ही काव्य चर्चा वगैरे अपेक्षित नसेल कदाचित !
आता १२ दिवस होऊन गेले ह्या घटनेला पण माझ्या मनात अजूनही हा प्रसंग तरळतोय .. त्यामुळे आज म्हंटलं हे लिहून ठेवावे.
'मराठी भाषेचं काय होणार ? कविता वगैरे चं काय होणार .. हल्ली फार कोण वाचत ऐकत नाही ', हे सगळे चिंताजनक प्रश्न.. मला ही पडणारे ..पण असे काही अनुभव आले की परत सकारात्मक वाटतं .. की काही वाईट होणार नाहीये .. मराठी भाषा टिकणारचं .. अजूनही लोकं कविता आवडीने वाचतात ..ऐकतात .. एकाच दिवशी मी २ अनुभव घेतले .. एक तर कवितांचाच कार्यक्रम होता .. आणि दुसरी ही ट्रेन मधली अनोळखी(?) माणसासोबतची चर्चा!
जाता जाता एक गंमत सांगतो, अनेक जण विचारतात तसं त्यानेही आमच्या चर्चे दरम्यान विचारलं होतं की, "विंदा करंदीकर तुमचे नातेवाईक का ..किंवा आजोबा का?", मी नेहमी प्रमाणे सांगितलं, "नाही हो .. पण ते माझे आवडते कवी आहेत". आता ह्यात गंमत अशी की माझ्याही आजोबांचं नाव 'गोविंद' च होतं ... (कोणाला माहित नसेल तर सांगतो .. विंदा करंदीकर म्हणजे गोविंद विनायक करंदीकर...), आणि अजून एक गोष्ट अशी की, माझे बाबा रुईया कॉलेज मध्ये असताना त्यांच्या वर्गात विंदा करंदीकर यांचा मुलगा होता.
- ओंकार करंदीकर ( २२ एप्रिल , २०२५)